Monday, May 3, 2010

मुक्तपीठ कट्टा क्र. २

स्थळ :- श्री. व सौ. पळसुले ह्यांचे सुखशांती सदन (नेहमीप्रमाणेच)

गेले काही दिवस चर्चेत असलेला आणी उत्कंठेने ज्याची वाट बघणे चालु होते तो १ तारखेचा दिवस एकदाचा उगवला.

संध्याकाळी मुपी कट्टा असल्याने दिवस कधी संध्याकाळकडे सरकतो असे झाले होते. दुपारच्या सुमाराला अक्षु उर्फ सखारामला फोन करुन माझ्याकडेच बोलावुन घेतले. दोघांनी मिळुन साधारण ४.३० च्या सुमारास पळसुले काकांच्या घरी 'एंट्री' घ्यावी असा विचार होता. परंतु माझा आणी अक्षुचा फोन संपतो ना संपतो तोच चिंतामणी काकांचा फोन आला, काकांनी जरा लवकर म्हणजे साधारण ३-३० च्या सुमारासच यायचा आदेश दिला. चादरी वगैरे घालणे कार्यक्रमाची धास्ती घेउन मी आणी अक्षु "हो- हो , आलोच" असे म्हणत ५ च्या सुमारास काकांच्या घरी हजेरी लावली.

काकांच्या घरात प्रवेश करताच आधी स्वामिजींचे प्रसन्न दर्शन झाले. त्यांच्या समोरच कंप्लिट आराम (CA) निलेश आणी नरेंद्र साहेब बसलेले होते, मी आणी अक्षुनी लगेच स्वमिजींसमोर बैठक मारली. पळसुले काकुंनी बाहेर येउन मी आल्याची खात्री करुन घेतली. (काकुंनी नजरेनीच माझ्या मानेचे माप घेतले व पुन्हा आत गेल्या)
थोड्याच वेळात अभिदा, वहिनी, सई बरोबर सम्राटदाचे आगमन झाले. त्या मागोमाग मीनलतै व समीर जोशी देखील उपस्थीत झाले. चिंतामणी काकांना आलेल्या फोनकॉल वरुन लवकरच सुहास गोरे काका चक्क इचलकरंजीहुन उपस्थीती लावण्यासाठी येत आहेत हि बातमी मिळाली. त्यांच्या काही वेळ आधीच प्रधान काकांचे आगमन झाले. एका बाजुला वड्यांची तयारी करता करता स्वामिजी सर्वांनाच वेगवेगळ्या विषयांवर मार्गदर्शन करत होते. जमिनीवर फतकल मारुन बसण्याची सवय नसल्याने मंडळी आलटुन पालटुन मांड्या बदलुन स्वामिजींकडून मिळणारे ज्ञानामृत प्राशन करत होती. मधल्या काळात महिलावर्गाने ज्योतीकाकुंच्या 'कलाकुसरीचा' लुत्फ उठवला. आमच्या सर्वांच्यात एकटी मीनलतैच कामसू आहे हे ओळखुन ज्योतीकाकुंनी तीला कोथींबीर चिरायला बसवले. मीनलतै अधुन मधुन टिपीकल एखादी "काउन्सलर लाईन" टाकुन दाद मिळवत होतीच.

स्वामिजी काही वेळाने स्वयंपाकघराकडे वळले. आता त्यांचे आतमध्ये पाककलेवरती महिलावर्गाला मार्गदर्शन चालु झाले. इकडे बाहेरच्या बाजुला आता आम्ही अभिदा व सम्राटदाला वेगवेगळे प्रश्न विचारुन भंडावुन सोडले होते. काहे वेळ असाच मौज मजेत गेल्यावर आतुन फारच चवदार असे वास येण्यास सुरुवात झाल्यावर मंडळींच्या नजरा आतमध्ये वळु लागल्या होत्या. काही वेळातच चिंतामणी काकांनी पाण्यांचे पिंपच बाहेर आणुन ठेवले. पाण्याबरोबर त्यांनी खारे दाणे खायला देउन जो सूड उगवला तो मात्र वर्णनातीत आहे !आता ७ वाजून गेल्याने मंडळी २०-२० वर्ल्ड कपच्या भारताच्या मॅचचा आनंद घेउ लागली. मॅच बघत असतानाच अभिजित थिटे व त्यांची कन्या सई हे दोघेही 'क्रिकेटद्वेष्टे' असल्याचे मंडळींच्या लक्षात आले. काही वेळातच स्वामिजी पुन्हा बाहेरच्या बैठकीत सामील झाले. आता स्वामिजींचे गीता व मराठी भाषा / तिची गळचेपी ह्यावरचे मौलीक विचार आम्हाला जाणुन घेता आले. सर्वच विषयातले स्वामिजींचे ज्ञान पाहुन खरच थक्क व्हायला झाले. बर येवढी ज्ञानाची गंगा जवळ असुनही स्वामिजी मात्र अगदी बोलके आणी सहज सगळ्यांच्यात मिसळुन जाणारे आहेत हे बघुन अजुनच आदर वाढुन गेला. (इथे उगीचच स्वतःचा माजोरीपण आठवुन गेला, हे सांगायला नकोच)

काही वेळातच आतुन आलेल्या चविष्ट गरमागरम बटाटा वड्यांनी चर्चा अजुनच खमंग करण्यात मोलाचा हातभार लावला. या चवदार वड्यांचे पुर्ण क्रेडीट फक्त स्वामिजींनाच ! वड्यांच्या २/३ फेर्‍यांनंतर मीनलतैनी करुन आणलेल्या अप्रतिम चॉकलेटसचा समाचार घेण्यात मंडळी मग्न झाली. त्यानंतर मग गरमागरम खिचडीचा आनंद लुटला गेला. ह्या सर्व काळात वेगवेगळ्या विषयांवर चर्चा रंगत होत्याच. अध्ये मध्ये फोटु काढण्याचा उपक्रम राबवला जात होता.सर्वात शेवटी लिची स्क्वॅश विथ सोडा अँड आइसक्रीम अशा एका उत्कृष्ट तरल पेयाने खाद्य कार्यक्रमाची सांगता झाली.
पोटोबाला शांत केल्यानंतर काही वेळ पुन्हा एकदा चर्चा रंगात आल्या. मधल्या काळात मीनलतैनी सर्वांचा निरोप घेतला. (चॉकलेट छानच झाली होती हे सांगायचे राहुनच गेले. आता पुन्हा खायला मिळतील तेंव्हा सांगु !) आता हळुहळु मंडळींना घराचे वेध लागायला लागले. चर्चा आवरत्या घेत मग हळु हळु मंडळींनी एकमेकांचा निरोप घ्यायला सुरुवात केली. एका अविस्मरणीय संध्याकाळची भेट आज मिळाल्याचे समाधान सगळ्यांच्याच चेहर्‍यावर झळकत होते.========+++=======

(फोटोवर डबल क्लिक करुन फोटो मुळ आकारात पाहता येतील.)

(इतर कट्टेकरी मंडळींना देखील थोडाफार अनुभव लिहिता यावा, म्हणुन मी फक्त ह्या कट्ट्याचा धावता आढावा घेतला आहे.)

हा फोटो स्वामीजींनी काढलेला आहे. त्यांनी आपला एकही फोटो न काढल्याचा राग चिंताकाकांना आल्याने इथे डकविण्यात आला आहे.

8 comments:

 1. अरे वा..

  छान वृत्तांत आहे.

  ------------------------------

  चिंतामणी काकांनी पाण्यांचे पिंपच बाहेर आणुन ठेवले. पाण्याबरोबर त्यांनी खारे दाणे खायला देउन जो सूड उगवला तो मात्र वर्णनातीत आहे !

  []हा हा हा

  ---------------------------------------
  बर येवढी ज्ञानाची गंगा जवळ असुनही स्वामिजी मात्र अगदी बोलके आणी सहज सगळ्यांच्यात मिसळुन जाणारे आहेत हे बघुन अजुनच आदर वाढुन गेला. (इथे उगीचच स्वतःचा माजोरीपण आठवुन गेला, हे सांगायला नकोच)

  []तुझ्या प्रामाणीकपणाची दखल घेतलीच पाहीजे.

  ReplyDelete
 2. बेस्ट हो मृत्युंजयराव... क्रिकेटद्वेष अोळखलात ते बरं केलंत. सईला क्रिकेट अजिबात आवडत नाही. मॅच लावली की ती बंद करायला लावते. आणि माझं विचारशील, तर बघितली तरी चालते, नाही पाहिली तरी चालते. बघण्याचा आग्रह अजिबात नसतो. स्वतः खेळताना पहिली बॅटिंग, पहिली बाॅलिंग आणि बाऊंड्रिला, सावलीत फिल्डिंग असा पवित्रा असतो, तोच इथंही. मॅच बघायलाच बसलो, तर सचिन आऊट झाल्यानंतर मी उठतो...

  ReplyDelete
 3. एकदम झकास वर्णन केलय़....
  पुन्हा कार्य़क्रमाला हजर राहिल्यासारख वाटल.....

  ReplyDelete
 4. सभासदांची भेट! उत्तम कल्पना!
  ओर्कुट ला ज्या काही थोड्याफार comunity सक्रीय आहेत त्यात मुक्तपीठ आघाडीवर आहे. अशाप्रकारे सभासदांची भेट ठेवल्यामुळे social networking site चा मूळ हेतू साध्य झाला.
  आता पुढील वेळी मोठ्या प्रमाणावर मेळावा घेवू. व हे virtual ते थेट संपर्क ह्यातील अंतर कमी करून एकमेकांशी मनापासून जोडले जावू.

  ReplyDelete
 5. काय राव.. १ तारखेला पुण्यात होतो मी.
  सांगायचं तरी एकदा.

  ReplyDelete
 6. वा प्रसाद...उत्तम रिपोर्टिंग ....

  ReplyDelete
 7. हाय! आम्ही नसल्याची अपार खंत वाटते आहे......असो. १७ तारखेला योग येइलच. पण स्वामिजी नसतील.........

  ReplyDelete