Thursday, May 20, 2010

मुक्तपीठ परीवाराची स्नेहभेट

लेखक :- श्रद्धातै



आज मुक्तपीठ परीवाराची स्नेहभेट....खुपच उत्साहात होते मी...काहीजणांना प्रत्यक्ष भेटलेले पण यावेळी खुपच नवे चेहरे भेटणार होते..
पटवर्धन कुटुंबियांकडे मी, माझी कन्या गौरी, ज्योती आणि जिजु [चिंतामणी पळसुले] यांच्याबरोबर निघाले.आम्ही शिल्पाच्या घराजवळच पोचलो पण नक्की कुठे ते समजेना म्हणुन ज्योतीने शिल्पाला फ़ोनवले असता आम्ही कुठे आहोत ते सांगितल्याव्र तिथेच थांबा आलेच मी म्हणत तीने चिंतामणी मामांना पाठवले. ते धावत पळत [रेसमधे पळतात तसे] आम्हाला न्यायला आले की, रस्त्यावरचे बरेच जण हे असे का पळत आहेत अशा कुतुहलाने त्यांच्याकडे पहायला लागले. आम्ही लांबुनच त्यांना ओळखले. आम्हा तीघींना घेउन मामा घरी निघाले असता वाटेत एका जेष्ठ व्यक्तीने विचारले पण, का रे असे धावत होतास? पण त्यांना ते काय सांगणार की आपल्या मुपीच्या माननीय महिला सदस्यांचे पटवर्धनांच्या घरात आगमन होत होते आणि त्यातील एक स्वता मॉडरेटर होती आणि एक मॉडरेटरची सौ.... त्यांच्या स्वागतात कसुर करुन चालणार नव्हते. न जाणो उद्या बॅन केलं तर? :P



असो... तर सुहास्य वदनाने शिल्पा आणि चिंतामणी यांनी आमचे स्वागत केले. घरी सर्व तयारी करुन ठेवलेली होतीच. हॉल मधे सतरंज्या घालुन तयार होत्या..[ हा पशा त्यासाठी उशीरा येणार होता]...ग्लास आणि बाटल्या हॉलमधे तयारच होत्या ...हा हा थांब पशा लगेच डोळे मोठे करुन बघु नकोस...पाण्याच्या बाटल्या होत्या त्या. आम्ही पोचल्यावर ५ मिनिटातच समीर जोशीचे आगमन झाले आणि तेवढ्यातच मामांचा फ़ोन वाजला, कोणीतरी जवळपास आलेले होते.... मामा परत पळाले आणि परदेशस्थ निनाद कुलकर्णी याला घेउन आले.

शिल्पाची ऑर्डर झाली आणि मामा परत पळाले...कशासाठी? अहो पावभाजी आणि आइस्क्रीम आणण्यासाठी...सोबत ते समीर आणि निनाद ला घेउन गेले. एवढ्यात माझा फ़ोन वाजला आणि मी पण पळाले...का? जा बाबा मी नाही सांगणार [:P] बरोबर ओळखले आपली आरती आलेली तीला आणि सोनालीला घेउन आले मी...त्याचवेळी जान्हवीचे पण [सौ.सुहास गोरे] आगमन झाले. मधेच मी कुणाचा तरी फ़ोन आल्याने फ़ोन वर बोलत बाहेर गेले तेव्हा निर्झर उर्फ़ तुषार आला..आणि लागोपाठच मंजीरी, मीनल, सुलक्षणा,अपर्णा,लता आणि ऋता पण आल्या.योगेश आणि सुयोग पण प्रवेशकर्ते झाले. सुयोग स्वामीजींनी घातलेल्या भितीमुळे जरा सावधपणे इकडे तिकडे बघतच आत आला. वृषाली आणि गौरी आल्या पण संजयचा अजुन पत्ता नव्ह्ता. [सासुरवाडी सोडवत नव्हती बहुधा अजुन] आणि थोड्याच वेळात जळगावच्या या डॉनचे आगमन सुपुत्रासहीत झाले. सुहास पण त्याच वेळेत आला. एवढे सदस्य आले तरी अजुन मा.मा. आणि आ.मा. यांचा तसेच जिजु,पशा, अमृता आणि आमचे चिरंजीव यांचा पत्ता नव्हता.अनंत कुलकर्णी,शामु,निलेश पण अजुन आलेले नव्हते. सम्राट बरोबर फ़ोनवर बोलणे झाले असता त्याच दिवशी त्याच्या सौ गावहुन आल्याने त्यांच्या दिमतीसाठी व्यस्त असल्याने जमेल असे वाटत नाही म्हणाला. साहजीकच आहे.. बहुधा स्नेहभेटीचा नियम वाचला नसेल त्याने. :P



आणि १५ मिनिटातच या राहिलेल्या कंपुचे आगमन झाले...प्रधानकाका पण आले. प्रसाद ने आत आल्या आल्याच मीनलकडे अतिशय प्रेमाने पाहिले आणि माझ्यासाठीच्या वालनहाणासाठी वाल आणले नाहीस ना असे डोळ्यानेच विचारले तर मीनलने आपण आणलेल्या वालांमधे पशाचे वालनहाण होइल ना शा साशंकतेने पाहिले... आज आपली मुपी सदस्या वृषालीचा वाढदिवस असल्याने तीचा शिल्पाच्या हस्ते बुके देउन सर्वांनी अभिनंदन केले......आणि त्यानंतर चालु झाली ओळख परेड....आणि हास्याचे तुषार, कारंजी, धबधबे क्रमाक्रमाने कोसळु लागले...ओळखी दरम्यान अभिजीतने कंप्लीट आराम निलेश ची चांगलीच मुलाखत घेतली...निलेशला अगदी दाखवायला आणलेल्या मुलाचा फ़ील आला असेल बहुधा... :P याच ओळखी दरम्यान आमच्या चिरंजीवांनी आमची विकेट घेतली [तो माझा दोडका मुलगा आहे असे सांगुन] ....तसेच मला मुपीच्या मातोश्री ही पदवी अभिजीत ने मुक्तकंठांने बहाल केली...



ओळख चालु असतानाच सर्वांचेच लक्ष आणि नाक स्वैपाकघराच्या दिशेकडे लागलेले. पावभाजीच्या दरवळलेल्या गंधाने हातात केव्हा एकदा प्लेटस येतात असे सगळ्यांनाच झालेले. सर्व महिलामंडळाच्या मदतीने पावभाजीच्या प्लेटस सर्वांना दिल्या आणि गप्पा मारत हाता तोंडाची लढाई चालु झाली. सगळ्यांनीच पावभाजीवर मनसोक्त ताव मारला.

पण पशा आणि निलेश कुठे दिसेनात....चौकशीअंती ते दोघे केक आणण्यासाठी पिटाळलेले होते असे समजले. काही मित्रमंडळींचे आणि महिला वर्गाचे खाउन होत आले असतानाच प्रसाद आणि निलेश केक घेउन आले.
वृषालीने केक कापताच सगळ्यांनी परत तीचे अभिष्टचिंतन केले आणि संजयने केक चा तुकडा प्रेमभराने सर्वांच्या उपस्थितीत वृषालीला भरवला आणि काय लाजली वृषाली.....वृषालीच्या चेहर्‍यावरचे ते गोड भाव ...आहाहा....संजय बहुधा सगळे आहेत जवळपास हे विसरुन पहातच राहिला तिच्याकडे. वृषालीने गौरी आणि तन्मय ला पण केक खाऊ घातला...राहिलेले महिला मंडळ,पशा आणि निलेश पावभाजीचा आस्वाद घेउ लागले..सुलक्षणा आणि अमृता या आम्हाला पावभाजी आग्रहाने वाढुन आपण गृहकृत्यदक्ष असल्याचे दाखवुन देत होत्या [ यंदा कर्तव्य आहे की काय? :P ] पण त्या दोघींनी राहिलेल्या मंडळींना छानच वाढले हे खरे..



पावभाजी खाउन झाल्यावर व्हॅनिला आइस्क्रीम चा स्वाद सगळ्यांनीच मनसोक्त घेतला. अभिजीत आणि जिजु तिथे पण चिअर्स करण्याच्या मुड मधेच...ग्रेटच..आइस्क्रीमचा स्वाद घेतानाच अभिजीतने एक घोषणा केली...

१. आपण एक शॉर्टफिल्म करायची म्हणतो आहोत. आपल्या कम्युनिटीतील एक सदस्य संदीप बढे यांची ही कल्पना आहे. सारी कामं आपणच करायची. अगदी गरजेपुरती बाहेरची मदत घ्यायची. कथा, पटकथा, संवाद, अभिनय अशा साऱ्या गोष्टी आपणच सांभाळायच्या आहेत.

आणि प्रसाद ने दुसरी घोषणा केली..

२. आपण मुपिकर या नावानं ऑनलाईन रेडिओ सुरू केला आहे. त्यात फक्त गाणी वाजवण्याऐवजी आपल्या सदस्यांनीच सादरीकरण करावं अशी अपेक्षा आहे. म्हणजे कोणी कवितावाचन करेल, कोणी पुस्तकातील उतारे वाचेल, कोणी आपले लेखन सादर करेल, कोणी मुलाखती घेईल किंवा काहीही...

सगळ्यांनाच या दोन्ही घोषणा ऐकुन आनंद झाला....टाळ्यांच्या गजरात दोन्ही घोषणांचे स्वागत झाले...

राहिलेल्यांचे आइस्क्रीम खाउन झाल्यावर एकेकाला घरी परतण्याचे वेध लागले.... मी आणि ज्योती शेवटी निघालो...

खरच कार्यक्रम तर एकदम बहारदार झाला...महत्वाचे म्हणजे आम्ही कोणीच नव्याने भेटतोय असे वाटले नाही सगळे बालपणीचे मित्र मैत्रिणी भेटत आहोत असे वाटले...मुख्यम्हणजे मुक्तपीठची स्नेहभेट असुन पण मुपीचा विषय नव्हता मस्त गप्पा रंगल्या.....



खरेतर शिल्पा आणि चिंतामणी यांचे मनापासुन आभार मानावेसे वाटतात...खुपच अगत्याने त्यांनी हा कार्यक्रम सगळ्यांच्या साथीने संपन्न केला...


इतर फोटुंची लिंक :- http://picasaweb.google.co.in/soudikarshraddha888/MuktpeethSnehabhet?feat=directlink#

Monday, May 3, 2010

मुक्तपीठ कट्टा क्र. २

स्थळ :- श्री. व सौ. पळसुले ह्यांचे सुखशांती सदन (नेहमीप्रमाणेच)

गेले काही दिवस चर्चेत असलेला आणी उत्कंठेने ज्याची वाट बघणे चालु होते तो १ तारखेचा दिवस एकदाचा उगवला.

संध्याकाळी मुपी कट्टा असल्याने दिवस कधी संध्याकाळकडे सरकतो असे झाले होते. दुपारच्या सुमाराला अक्षु उर्फ सखारामला फोन करुन माझ्याकडेच बोलावुन घेतले. दोघांनी मिळुन साधारण ४.३० च्या सुमारास पळसुले काकांच्या घरी 'एंट्री' घ्यावी असा विचार होता. परंतु माझा आणी अक्षुचा फोन संपतो ना संपतो तोच चिंतामणी काकांचा फोन आला, काकांनी जरा लवकर म्हणजे साधारण ३-३० च्या सुमारासच यायचा आदेश दिला. चादरी वगैरे घालणे कार्यक्रमाची धास्ती घेउन मी आणी अक्षु "हो- हो , आलोच" असे म्हणत ५ च्या सुमारास काकांच्या घरी हजेरी लावली.

काकांच्या घरात प्रवेश करताच आधी स्वामिजींचे प्रसन्न दर्शन झाले. त्यांच्या समोरच कंप्लिट आराम (CA) निलेश आणी नरेंद्र साहेब बसलेले होते, मी आणी अक्षुनी लगेच स्वमिजींसमोर बैठक मारली. पळसुले काकुंनी बाहेर येउन मी आल्याची खात्री करुन घेतली. (काकुंनी नजरेनीच माझ्या मानेचे माप घेतले व पुन्हा आत गेल्या)




थोड्याच वेळात अभिदा, वहिनी, सई बरोबर सम्राटदाचे आगमन झाले. त्या मागोमाग मीनलतै व समीर जोशी देखील उपस्थीत झाले. चिंतामणी काकांना आलेल्या फोनकॉल वरुन लवकरच सुहास गोरे काका चक्क इचलकरंजीहुन उपस्थीती लावण्यासाठी येत आहेत हि बातमी मिळाली. त्यांच्या काही वेळ आधीच प्रधान काकांचे आगमन झाले. एका बाजुला वड्यांची तयारी करता करता स्वामिजी सर्वांनाच वेगवेगळ्या विषयांवर मार्गदर्शन करत होते. जमिनीवर फतकल मारुन बसण्याची सवय नसल्याने मंडळी आलटुन पालटुन मांड्या बदलुन स्वामिजींकडून मिळणारे ज्ञानामृत प्राशन करत होती. मधल्या काळात महिलावर्गाने ज्योतीकाकुंच्या 'कलाकुसरीचा' लुत्फ उठवला. आमच्या सर्वांच्यात एकटी मीनलतैच कामसू आहे हे ओळखुन ज्योतीकाकुंनी तीला कोथींबीर चिरायला बसवले. मीनलतै अधुन मधुन टिपीकल एखादी "काउन्सलर लाईन" टाकुन दाद मिळवत होतीच.





स्वामिजी काही वेळाने स्वयंपाकघराकडे वळले. आता त्यांचे आतमध्ये पाककलेवरती महिलावर्गाला मार्गदर्शन चालु झाले. इकडे बाहेरच्या बाजुला आता आम्ही अभिदा व सम्राटदाला वेगवेगळे प्रश्न विचारुन भंडावुन सोडले होते. काहे वेळ असाच मौज मजेत गेल्यावर आतुन फारच चवदार असे वास येण्यास सुरुवात झाल्यावर मंडळींच्या नजरा आतमध्ये वळु लागल्या होत्या. काही वेळातच चिंतामणी काकांनी पाण्यांचे पिंपच बाहेर आणुन ठेवले. पाण्याबरोबर त्यांनी खारे दाणे खायला देउन जो सूड उगवला तो मात्र वर्णनातीत आहे !



आता ७ वाजून गेल्याने मंडळी २०-२० वर्ल्ड कपच्या भारताच्या मॅचचा आनंद घेउ लागली. मॅच बघत असतानाच अभिजित थिटे व त्यांची कन्या सई हे दोघेही 'क्रिकेटद्वेष्टे' असल्याचे मंडळींच्या लक्षात आले. काही वेळातच स्वामिजी पुन्हा बाहेरच्या बैठकीत सामील झाले. आता स्वामिजींचे गीता व मराठी भाषा / तिची गळचेपी ह्यावरचे मौलीक विचार आम्हाला जाणुन घेता आले. सर्वच विषयातले स्वामिजींचे ज्ञान पाहुन खरच थक्क व्हायला झाले. बर येवढी ज्ञानाची गंगा जवळ असुनही स्वामिजी मात्र अगदी बोलके आणी सहज सगळ्यांच्यात मिसळुन जाणारे आहेत हे बघुन अजुनच आदर वाढुन गेला. (इथे उगीचच स्वतःचा माजोरीपण आठवुन गेला, हे सांगायला नकोच)

काही वेळातच आतुन आलेल्या चविष्ट गरमागरम बटाटा वड्यांनी चर्चा अजुनच खमंग करण्यात मोलाचा हातभार लावला. या चवदार वड्यांचे पुर्ण क्रेडीट फक्त स्वामिजींनाच ! वड्यांच्या २/३ फेर्‍यांनंतर मीनलतैनी करुन आणलेल्या अप्रतिम चॉकलेटसचा समाचार घेण्यात मंडळी मग्न झाली. त्यानंतर मग गरमागरम खिचडीचा आनंद लुटला गेला. ह्या सर्व काळात वेगवेगळ्या विषयांवर चर्चा रंगत होत्याच. अध्ये मध्ये फोटु काढण्याचा उपक्रम राबवला जात होता.सर्वात शेवटी लिची स्क्वॅश विथ सोडा अँड आइसक्रीम अशा एका उत्कृष्ट तरल पेयाने खाद्य कार्यक्रमाची सांगता झाली.




पोटोबाला शांत केल्यानंतर काही वेळ पुन्हा एकदा चर्चा रंगात आल्या. मधल्या काळात मीनलतैनी सर्वांचा निरोप घेतला. (चॉकलेट छानच झाली होती हे सांगायचे राहुनच गेले. आता पुन्हा खायला मिळतील तेंव्हा सांगु !) आता हळुहळु मंडळींना घराचे वेध लागायला लागले. चर्चा आवरत्या घेत मग हळु हळु मंडळींनी एकमेकांचा निरोप घ्यायला सुरुवात केली. एका अविस्मरणीय संध्याकाळची भेट आज मिळाल्याचे समाधान सगळ्यांच्याच चेहर्‍यावर झळकत होते.



========+++=======

(फोटोवर डबल क्लिक करुन फोटो मुळ आकारात पाहता येतील.)

(इतर कट्टेकरी मंडळींना देखील थोडाफार अनुभव लिहिता यावा, म्हणुन मी फक्त ह्या कट्ट्याचा धावता आढावा घेतला आहे.)

हा फोटो स्वामीजींनी काढलेला आहे. त्यांनी आपला एकही फोटो न काढल्याचा राग चिंताकाकांना आल्याने इथे डकविण्यात आला आहे.

Friday, November 6, 2009

अभिजित थिटे ह्यांचे अभिनंदन

आपल्या समुहाचे मालक व सर्वेसर्वा श्री. अभिजितरावजी थिटेजी साहेब ह्यांचा नुकताच त्यांनी लिहिलेल्या 'तेजशलाका - इरेना सेंडलर' ह्या पुस्तकासाठी 'ज्युइश काउन्सिल ऑफ इंडिया' तर्फे सत्कार करण्यात आला.

हे पुस्तक लिहून त्यांच्या कम्युनिटीसाठी मोठं योगदान अभिजितदा ह्यांनी दिले आहे असे सत्कारात नमुद करण्यात आले. सत्कार इस्राईल काउन्सलेटच्या काउन्सिल जनरल 'ऑर्ना सॅगिव्ह' यांच्या हस्ते झाला. मनोहर जोशी ह्यांची ह्या कार्यक्रमाला विशेष उपस्थीती होती.

या 'तेजशलाका इरेना सेंडलर' या पुस्तकाचं प्रकाशन इस्राईल काउन्सलेटच्या काउन्सिल जनरल 'ऑर्ना सॅगिव्ह' आणि पोलंडच्या काउन्सिल जनरल यांनी केले आहे.

श्री. अभिजित थिटे उर्फ आपले लाडके अभिजितदा ह्यांचे ह्या यशाबद्दल त्रिवार अभिनंदन व मुक्तपीठ परिवारातर्फे अनेकानेक शुभेच्छा. तुमच्या यशाचा आलेख असाच चढता राहो.

ह्या पुस्तकाचा प्रिव्ह्यु इथे पाहता येईल :-
http://issuu.com/ameyaprakashan/docs/tejshalaka_irena_sendler_preview





(नेहमीप्रमाणेच फोटोवर क्लिक करुन 'लार्ज व्ह्यु' पाहता येईल.)

Monday, November 2, 2009

मुक्तपीठ डेक्कन कट्टा

(फोटोवर क्लिक करुन पुर्ण आकारातील फोटो बघता येतील)

शनीवारी संध्याकाळी अचानक फोन खणखणला, रात्रीच्या पाणवठ्याचे मनसुबे रचत असतानाचा फोन वाजल्याने जरा वैतागल्यासारखे झाले. बघितले तर चिंतामणी काकांचा फोनवा आला होता.

"अरे येतोयस ना? आम्ही वाट बघतोय." चिंतामणी काकांचा यॉर्कर.

"कुठे येतोयना ? काय म्हणताय काही कळत नाहीये हो काका" माझा अगतीक डिफेन्स करण्याचा प्रयत्न.

"अरे बाबा राहुल आलाय, विक्रम आलाय आणी अभिजित पोचतोय. मी दिवसभर बाहेर असल्याने तुला फोन करायला जमले नाही मला. ताबडतोब निघ आणी डेक्कन क्लबला पोच."

राघोबा काकांची आज्ञा झाल्या बरोब्बर मी नारायणरावासारखा २० मिनिटात तय्यार होउन डेक्कनकडे कुच केली. त्या अवधित मालकांशी फोनवर चर्चा झाली, मालक आमच्या आधीच रणांगणात पोचले होते. ताबडतोब रिक्षा करुन डेक्कन क्लब गाठला. पळसुले काकांचा 'गेस्ट' आहे असे सांगीतल्यावर खालचा सिक्युरीटी गार्ड एकदम सावरुन वगैरे बसला (घरी काकुं हॉल मध्ये आल्या की काका असेच सावरुन बसतात हे मागच्या कट्ट्यालाच मी हेरले होते. श्रद्धातै तर मागच्या कट्ट्याला पुर्णवेळ हॉलमध्येच बसुन असल्याने तीचे मिस्टर फुल्लटु अटेंशन पोझीशन मध्येच होते. बाय दवे हा कट्टा दिवाळीत झाला, ह्याचा वृतांत उद्या टाकतो. ह्या कट्ट्याला मी, श्रद्धातै (सह कुटुंब)मालक, अक्षु, नरेंद्र साहेब ह्यांनी चिंतामणी काकांच्या घरी हजेरी लावली होती)

हान तर गार्डनी केलेल्या मार्गदर्शनानुसार आम्ही गच्चीत पोचलो, वरती 'लढाई' अगदी रंगात आली होती. चिंतामणी काका व मालक ह्यांचा परिचय होताच, विक्रमदादांना फोटुमुळे पाहिल्या बरोबर ओळखले. एक काळा सावळासा तरुण माझ्याकडे बघुन हसत होता, "ह्यांना ओळखले का? हे गौतम आदमाने" राहुल अफ्रिकीनी ओळख करुन दिली.


(राहुल अफ्रीकी, गौतम आदमाने आणी चिंतामणी काका)

अर्र तेज्यायला ! हे गौतम आदमाने ? फोटुत चाळीशीचा वाटणारा हा माणुस चक्क चक्क आपल्यापेक्षा वयानी २/३ वर्षानी मोठा असा तिशीतला तरुण आहे हे बघुन मला धक्काच बसला. "राहुल शेठ अहो गौतम आदमाने नाही 'अर्जुन' म्हणा राव त्यांना, माझे मोठे शत्रु." मी तेव्हड्यात एक सवयीने हिणकस शेरा मारुन घेतला. दोघे एकमेकांकडे बघुन निर्मळ हासलो आणी 'लढाईला' जुंपलो.

मुक्तपीठावरची लोक कशी असतील काय सांगता येत नाही, उगाच रिस्क नको म्हणुन राहुल अफ्रिकी आपल्या बरोबर २ तगड्या मित्रांना बरोबर घेउन आले होते. हे मित्र अफ्रिकेतही त्यांच्या बरोबर होते म्हणे. ओळखी पाळखी झाल्यावर मग गप्पांना खरा रंग भरला. 'वारुणीचे' २/२ राउंड संपले आणी गप्पा खर्‍या अर्थाने खुलु लागल्या.



(राहुल आणी त्याचा संरक्षक मित्र सचिन कवडे )

सर्वात आधी मालकांनी मुक्तपीठावर चालणारे वाद, काही चांगल्या चर्चा तसेच सभासदांविषयी चार गोष्टी ऐकवल्या, पण एकुणात मालक खुष दिसत होते. त्यानंतर मग डेक्कन क्लबची माहिती आणी खेळ आणी त्यातील राजकारण ह्यावर चिंतामणी काकांचे मौलीक विचार ऐकुन झाले. राहुल, मालक आणी राहुलच्या मित्रांकडुन विविध धर्म व त्यातील गंमतीजंमतीचे विधी, सण ते साजरे करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती ह्याबाबत मनोरंजनात्मक माहिती मिळाली. मधल्या वेळात काही तातडीच्या कामानी विक्रम ह्यांनी आमची रजा घेतली. जाताना सर्वांना आपल्या गावचे आग्रहाचे निमंत्रण द्यायला ते विसरले नाहीत.


(गौतम आदमाने आणी शेजारी सुहास्य वदनाने विक्रम राजे)


(मालक आपले चार मार्गदर्शनपर शब्द ऐकवताना)


(चिंतामणी काका आणी मृत्युंजयाची तु तु मै मै)


(मंडळी भोजनाचा आस्वाद घेताना)

मुक्तपीठावर काय अभिनव राबवता येईल ह्यावर चर्चा चालु असतानाच नरेंद्रजी गोळेजी ह्यांचे आगमन झाले, साहेब स्वभावानी अतिशय शांत असल्याने ते फक्त ऐकण्याचे काम करण्यात लगेचच मग्न झाले. सगळ्यांचा आवडता 'फेक प्रोफाईल्स' हा विषय निघाल्यावर मात्र गोळे साहेबांनी आपल्या ४ शब्दांची लगेचच भर घातली.

वाद, संवादाचा भर ओसरल्यावर भुकेची जाणीव व्हायला लागली, थोड्याच वेळात शाकाहारी, मांसाहारी पदार्थांची ऑर्डर दिली गेली आणी मंडळी काहि वेळातच 'अन्न हे पुर्णब्रम्ह' म्हणत भोजनाचा आनंद घेउ लागली. थोड्याच वेळात 'वन फॉर द रोडचा' आग्रह होउन त्याची पुर्तता झाल्यावर सगळ्यांनीच एकमेकांचा निरोप घेतला ते लवकरच पुन्हा भेटण्याचे पक्के ठरवुनच.


(निरोपाची तयारी,डाव्या हाताला नरेंद्र गोळे साहेबांची श्रवणभक्ती चालुच आहे, उजवीकडे दिपक साहेब , मुक्तपीठाचे एक सदस्य आणी राहुलचे एके काळचे अफ्रीकेतील सहकारी)

Sunday, November 1, 2009

मुपिकरांनो...

हा ब्लाॅग आपल्यातल्या घडामोडी, कट्टा वृत्तांत शेअर करण्यासाठी... पहिल्या वृत्तांतानं सुरुवात करतोय...